सुट्टीसाठी आला अन मित्रांसोबत फिरायला गेला; परतत असताना यवतेश्वर घाटात वाटेतचं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शनिवार आणि रविवार हा सुट्टीचा वार असल्याने या दिवशी त्यानं मस्तपैकी फिरायला जाण्याचा प्लॅन केला. मग शनिवारी कामावरून सुटताच मित्रांना फोन करून फिरायला जायचे आहे असे म्हणाला. ठरल्याप्रमाणे रविवारी मित्रांसोबत तो फिरायलाही गेला. दिवसभर फिरून झाल्यानंतर साताऱ्याच्या यवतेश्वर घाटातून परतत असताना वाटेटच त्याला काही युवकांनी गाठलं. त्याच्या गाडीला गाडी आडवी मारत तुला जिवंत सोडत नाही असं म्हणत त्यांनी कोयत्याने सपासप वार केले, ही थरारक घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता यवतेश्वरजवळील घाटाई मंदिर परिसरात घडली. हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

समर्थ लेंभे, शुभम राक्षे, सोन्या कांबळे व दोन अनोळखी यांच्या विरुद्ध वैभव प्रकाश गायकवाड (वय 36, रा. गडकर आळी, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की वैभव प्रकाश गायकवाड (वय 36, रा. बदामी विहिरीजवळ, गडकर आळी, सातारा) हा पुण्यातील एका कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करतो. सुटीसाठी तो शनिवारी साताऱ्यात आला. रविवारी तो कारमधून मित्रासमवेत कासला फिरायला गेला होता. सायंकाळी कासवरुन ते फिरून परत येत असताना कार घाटाई कॉर्नरजवळ आल्यानंतर समोरून आलेल्या क्रमांक (MH11 DA 1414) या कार चालकाने आडवी मारून वाहन थांबवले. त्यावेळी त्यातील संशयित सर्वजण खाली उतरून तक्रारदार वैभव गायकवाड यांच्याजवळ आले. संशयित तक्रारदार यांना उद्देशून जुन्या भांडणाच्या कारणातून वाद घालू लागले.

‘तू बाहेर ये. तुला लय मस्ती आली आहे. तुला जिवंत सोडत नाही, तुझा खूनच करतो,’ असे म्हणत कारमधून जबरदस्तीने बाहेर काढून डोक्यात, पाठीत, हातावर तलवारीने वार करत मारहाण केली. हल्ल्यानंतर संशयित तेथून पसार झाले. अचानक घडलेल्या घटनेने गायकवाड व त्यांचे सहकारी घाबरले. हल्ल्यात जखमी झाल्याने गायकवाड यांना त्यांच्या मित्राने उपचारासाठी रुग्णालयात नेले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात जावून जाबजबाब घेवून पंचानामा करून संशयितांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींची माहिती घेवून तात्काळ त्यांना अटक केली. सोमवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार ज्ञानेश्वर दळवी करत आहेत.