कराड प्रतिनिधी | मिरज तालुक्यातील बेडग गावात असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर तेथील दलित समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या समाजातील समाजबांधवांनी बेडग पासून थेट मुंबईकडे पायी लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलुपे लावून, बॅगा भरुन आंबेडकरी समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघाला असून ते काल सायंकाळी कराड येथे दाखल झाले. दरम्यान, पायी चालत निघाल्यामुळे यातील काही जणांना अशक्तपणाही आला. त्यातील चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील बेडग (ता. मिरज) गावातील दलित समाज सोडून मुंबईकडे चालत निघाला आहे. सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबे या लाँग मार्चमध्ये सहभागी झाली आहेत. 16 जून रोजी बेडग गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायत विरुद्ध दलित समाज, असा संघर्ष सुरू झाला होता. यातूनच दलित समाजाने गाव सोडण्याचा निर्धार करत माणगाव ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. हा लाँग मार्च रविवारी दुपारी कराडमध्ये दाखल झाला. यावेळी अजित कांबळे, तेजस कांबळे आणि अन्य दोन, अशा चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
कराडमध्ये दाखल झालेल्या लाँग मार्चमधील दलित कुटुंबांनी रविवारी रात्री प्रीतिसंगम हॉलमध्ये मुक्काम केला. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर हा लाँग मार्च सातार्याकडे मार्गस्थ झाला. या लाँग मार्चमधील दलित कुटुंबांनी सांगली जिल्हा प्रशासनाने गाव सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप करत निषेध केला. दलित कुटुंबे घरांना कुलुपे लावून चिमुकल्यांना सोबत घेऊन चालत मुंबईकडे निघाले आहेत.
दलितांच्या लाँग मार्चची दाखल नाही
मिरज तालुक्यातील बेडग गावापासून दलित कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून चालत मुंबईकडे निघाली आहेत. प्रमुख शहरांमध्ये रात्रीचा मुक्काम करून दुसर्या दिवशी ते पुढे मार्गस्थ होत आहेत. मात्र, सरकार आणि प्रशासनाने दलित कुटुंबांच्या या लाँग मार्चची अद्याप दखल घेतलेली नाही. गाव सोडून जाण्यास भाग पाडल्याचा आरोप करत सांगली जिल्हा प्रशासनाचा दलित कुटुंबांनी जाहीर निषेध केला आहे.