सातारा प्रतिनिधी । जबरी चोरी, दरोडा, विनयभंग, खंडणी, खून यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नागठाणे, ता. सातारा येथील चाैघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
टोळी प्रमुख अमित उर्फ कन्हैया सुनील साळुंखे (वय 32), साहील रुस्तम शिकलगार (24), अमर उर्फ भरत संजय मोहिते (26), अशिष बन्सीराम साळुंखे (27, रा. नागठाणे, ता. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, या संशयितांनी टोळी तयार करून सातारा जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण केली होती. कराड, सातारा, बोरगाव, उंब्रज पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये या महाभागांनी अनेक गुन्हे केले. खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करणे तसेच खंडणीसाठी अपहरण करून खून करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, कायदेशीर रखवालीमधून पळून जाणे यासारखे गंभीर गुन्हे या टोळीच्या नावावर दाखल आहेत.
या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक व कायदेशीर कारवाई करूनही ते जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा आपले उद्योग सुरू करत होते. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाला अधीक्षक शेख यांनी मंजुरी दिली असून, वरील चाैघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.
या कारवाईसाठी सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला.
35 जण हद्दपार
नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १२ उपद्रवी टोळ्यांमधील ३५ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्ह्यांमधील सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.