सातारा प्रतिनिधी । “तुम्ही सातारा शहराजवळ अपघात केला आहे,” असे सांगत कोयत्याच्या धाकाने परप्रांतिय तरुणाला लुटण्यात आल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे. यामध्ये अज्ञातांनी परप्रांतीय तरुणाकडून सुमारे साडे सात हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेत पसार झाले आहेत. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्यात शिखर प्रदीप श्रीवास्तव (रा. वास्तूखंड, गोमतीनगर लखनाै, उत्तरप्रदेश. सध्या रा. यशोदा नगर सातारा) यांनी लुटीबाबत तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अज्ञात चाैघा चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील रस्त्यावर हा प्रकार घडला. अज्ञात चाैघांनी “तुम्ही अपघात केला असून त्यात आम्हाला मार लागला आहे,” असे परप्रांतीय तरुणाला सांगितले.
त्यानंतर परप्रांतीय तरुणाला चौघांनी काेयत्याचा धाक दाखवून कारचा पाठलाग केला. तसेच कार फोडून टाकण्याची धमकी दिली. यावेळी परप्रांतीय तरुणाकडून जबरदस्तीने साडे सात हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्यानंतर चौघेजण घटनास्थळावरुन पसार झाले. सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक उमाप या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.