सातारा प्रतिनिधी | चार मोरांची शिकार करून वाहतूक करणाऱ्यास कर्मा वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे घडली आहे. संबंधित शिकाऱ्याकडून मोर मारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. कर्मा परशा काळे (रा. बोरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी मंगळवारी सायंकाळी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. वेळू गावच्या हद्दीत दि. १२ मे रोजी चार मोरांची शिकार केली जात असल्याची माहिती घार्गे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ वनपाल व वनरक्षक यांना कारवाईचे आदेश दिले. वन विभागाच्या पथकाने तात्काळ वेळू गावाकडे धाव घेतली.
कर्मा परशा काळे मोरांची शिकार करून मृतावस्थेतील मोर घेऊन जात असताना वन विभागाला सापडला. वन विभागाने वन अधिनियमाप्रमाणे त्याला ताब्यात घेतले. त्याच्याबरोबरच त्याच्या ताब्यातून सापळा साहित्य, फासगे व दोन दुचाकी जप्त केल्या. कोरेगावच्या वन विभागाने केलेल्या कारवाईबद्दल जिल्हा उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक रेशमा व्होरकाटे यांनी अभिनंदन केले.