पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक कारचा भीषण अपघात; चार प्रवाशी जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा हद्दीत सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात कारने महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. यामध्ये कारच्या पुढील बाजूच्या भागाचा चक्काचूर झाला तर आतील चार प्रवाशी जखमी झाले.

संजय मोहन देवकुळे (वय ५०), सुधीर श्रीरंग भिसे (५६), रंजीता सुधीर भिसे (४५) व साक्षी शेलार (५३, सर्वजण रा. दह्यारी-हवेली, पुणे) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी एका सेंट्रो कारमधून चार प्रवाशी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. कार क्रमांक (एमएच १२ आरके ४०२१) ही कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये एकूण चार प्रवाशी प्रवास करत होते. कार कराड नजीक पाचवड फाटा आटके गावच्या हद्दीत आली असता कारने महामार्गावर असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारमधील पुढील बाजूचा चक्काचूर झाला.

अपघाताची घटना घडताच नागरिकांनी याची माहिती तत्काळ महामार्ग देखभाल विभागास दिली. तसेच अपघातातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेंच्या साहाय्याने कारला बाहेर काढत महामार्गाच्या बाजूला नेले. या अपघाताची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.