सातारा प्रतिनिधी । सहकार विभागाशी निगडीत असलेल्या सर्व संस्थांचा कारभार हा पादर्शक असला पाहिजे, अशी शासनाची अपेक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व संस्थेत काम करणाऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमीपूजन मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडूरंग भोसेले, उपसभापती दिलीपराव अहिरेकर, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, कोरेगावच्या सहायक निबंधक प्रिया काळे आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उत्पन्नाचे विविध स्त्रोतांचा अभ्यास करुन उत्पन्न वाढविले पाहिजे, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरेगाव बाजार समितीला एकूण साडेनाऊ एकर जागा आहे. ही जागा मोठी असून याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. ही बाजार समिती आता 75 वर्षात पदार्पण करणार आहे. कोरेगाव खरेदी विक्री संघाचेही काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. या दोन्ही संस्थाना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील, असेही त्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपले उत्पन्न वाढविणे ही काळाजी गरज बनली आहे. यासाठी नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, असे आमदार श्री. निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उभारण्यात येणारे व्यापारी संकुल कोरेगावच्या वैभवात भर घालेल. या व्यापारी संकुलाचा शेतकरी, व्यापारी यांना नक्की फायदा होईल. या संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली जातील. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उत्पन्नाचे विविध स्त्रोत उपलब्ध करण्यात येतील, असे आमदार श्री. शिंदे यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.