कराड प्रतिनिधी | मलकापूर – कराड शहरातून पुणे – बंगळूरु राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. यात नांदलापूर ते कराड असा सुमारे ३.५ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचे काम काही महीनेपासून सुरु झाले आहे. हा उड्डाणपूल नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची स्वागत कमान ते कोयना नदीवरील नवीनपूल शहर हद्दीपर्यंत उतरणारा प्रस्तावित होता. मात्र, पुलाच्या मूळ आराखडयात कोणाच्या तरी हस्तक्षेपाने बदल करण्यात आला आहे. उड्डाणपूल करत असताना कराड शहरात वळण मार्ग देण्यात आलेला नाही. त्यामुळे कराडचा लोणावळा होण्याची भीती आहे. कराडचा लोणावळा केल्यास तीव्र लढा उभारू असल्याचा इशारा माजी आमदार आनंदराव पाटील यांनी दिला. उड्डाणपुलाच्या चुकीच्या कामास विरोध करण्यासाठी आम्ही कृती समिती स्थापन करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड भाजप शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, मनसे शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुका अध्यक्ष दादा शिंगण, सुलोचना पवार, माधवराव पवार, चंद्रकांत पवार, नितीन काशीद आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार पाटील म्हणाले की, पहिल्या आराखड्यात कराड शहरात जाण्यासाठी वळणमार्ग होता. मात्र, नवीन आराखडयात तो नसल्याने कराडसह मलकापूर शहराच्या व्यापारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या उड्डाणपुलामुळे कराडचा लोणावळा होण्याची भीती निर्माण झाली आहे. कराड-मलकापूरच्या हितासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सहकार्याने सर्वपक्षीय लढा उभारणार असून कराडचे महत्व कमी करणार असाल तर महामार्गाचे काम होऊ देणार नाही.
कराड शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून राज्यामध्ये नावारूपास आले आहे. या शहराचे मार्गदर्शक व भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख सबंध महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आहे ते आपले आधारस्तंभ स्वर्गीय श्री. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचे हे शहर आहे. त्यांच्या विचारांखाली व दूरदृष्टीमुळे आज कराड शहराची प्रगति झाली आहे हे खरे. पण ज्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी कराड शहराची काळजी जिवापाड घेतली आणि त्याकरिता पूर्वी नॅशनल हायवे कराडमधून गेला तर दळण – वळण सुधारेल व कराडची आपोआप प्रगती होईल, ही दूरदृष्टी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी ठेवली होती.
आज स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे हे स्वप्न भंग करण्याचा प्लान व कराड शहराला लोणावळासारखे रूप (डीटॅच) देणेचे काम फ्लायओवर ब्रिजच्या नवीन प्लानमुळे केले जाणार आहे, जे कराड शहराच्या व मलकापूरच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. सातारा शहराचे जर आपण पाहिले तर सातारा येथील हॉटेल फर्न येथे हायवे खाली उतरवून शहरातील लोकांना अप्रोच रस्ता देऊन पुन्हा पुणे-मुंबईकडे रस्त्याचा उड्डाणपूल प्लान केला आहे. त्याच प्रमाणे कराड शहरामध्ये पूर्वीप्रमाणे दोन्ही कराड व मलकापूर शहरांचे अस्तित्व अबाधित ठेवले पाहिजे, अशी प्रामुख्याने आमची अग्रही मागणी आहे.
सुरुवातीला वेगळा होता प्लॅन आताचा वेगळाच…
सन 2020-2021 साली एनएचएआयचा कराड मलकापूर फ्लायओवर ब्रिजचा DPR प्लान हा वेगळा होता व आज काम वेगळ्या प्लानप्रमाणे चालू आहे. यामध्ये प्रामुख्याने पाहिले तर नांदलापूर फाटा ते कराड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब कमानी पुढे कोयना नदीच्या अलीकडे उतरणारा DPR मंजूर प्लान होता. परंतु हा प्लान आज रोजी नांदलापूर ते नदी पलीकडे वारुंजी-गोटे फाटा ओवरब्रिज असा केला गेला आहे.
प्लॅनमध्ये केलेला बदल कोणाच्या हस्तक्षेपामुळे?
कराड शहारच्या सर्वांगीण विकासकारिता पूर्वीच्या 2021 प्लाननुसार कोणतेही नॅशनल हायवेचे वाहन हे कोयना नदीपूर्वी कराड शहरामध्ये उतरणार होते आणि याचा फायदा सर्व व्यापारी व नागरिकांना होणार होता. परंतु सदर प्लानमध्ये आज रोजी हा बदल कोणाच्या हस्तक्षेपामुळे होत आहे का? याचे कारण काय? आणि शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना आयुष्यभर वारुंजी फाटयावरून परत शहरामध्ये येण्याची शिक्षा का? असा सवाल माजी आमदार पाटील यांनी केला.
सलग तीन वर्षे लढा सुरू…
कराडचे लोणावळासारखे चित्र होऊ नये म्हणून माझ्यासह इतरांनी सन 2021 पासून याचा पाठपुरावा सुरू आहे. सदर एनएचएआय अधिकारी यांनी आदर ठेवून अजूनही उत्तर दिशेला म्हणजेच कोयना नदीकडील बाजूला फ्लायओवरचे काम अजूनही चालू केले नव्हते. परंतु हे किती दिवस थांबणार. या प्रकरणामध्ये आम्ही खा. उदयनराजे भोसले यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी कराडचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून कराड व मलकापूरचे लोकप्रतिनिधी यांचे समवेत मिटिंग करून संबंधित एनएचएआय अधिकारी यांना सूचनाही दिलेल्या आहेत.
असा आहे नविन प्लॅन…
कराड शहराच्या व मलकापूर शहराच्या ठिकाणी होणारा नवीन फ्लायओवर ब्रिज हा 678.830 ते 682.300 KM या ठिकाणी असून त्याचा येडीयंट स्लोपे हा उत्तर (कोयना नदी) बाजूला 682.450 KM होता, परंतु आज हा प्लान बदलून फ्लायओवरचा ग्रेडीयंट स्लोपे हा 682.850 KM जोडून कराड शहराचे ट्रफिक किंवा हायवेवरुन येणारे ट्रफिक हे वारुजी फाटावरुन परत कराडमध्ये आणण्याचा घाट रचला गेला आहे. असे जर झाले तर बेंगलूरू, कोल्हापूरवरुन येणारा माणूस हा कराड शहरामध्ये कधीच उतरणार नाही आणि तसाच पुढे निघून जाणार आणि निकाली कराड शहराचे अस्तित्व हळूहळू संपणार असून सर्व व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नागरिक यांना याचा निश्चित तोटा होणार आहे.
कराड महामार्गापासून वंचित होण्याची भीती…
सातारा, सांगली पश्चिम महाराष्ट्राचे मध्यवर्ती ठिकाण असणारे आपले कराड शहर नॅशनल हायवेपासून वंचित होणार, असे चित्र आज रोजी दिसत आहे व याचा विचार होणे गरजेचे आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, मा. राजेंद्रसिंह यादव यांनी कराडमध्ये नगरपालिकेचे सर्व लोकप्रतिनिधी व नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यासमवेत मीटिंग घेतली व कराडचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून तसा प्लान करून मा. ना. श्री. नितिनजी गडकरी साहेब यांच्या कडे पाठवावा, असे निर्देश दिले आहेत तसेच कराड येथील भेटी प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांना ही यासंबंधी निवेदन माजी आमदार आनंदराव पाटील यांनी दिले आहे. त्यांनी सुद्धा मा प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण तसेच प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांना कराड व मलकापूरच्या दृष्टीने व लोकांना याचा लाभ होईल, या हेतुने पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनाही याबाबत आम्ही निवेदन दिले आहे. आपण नागरिकांनी याचा विरोध करून कराड शहरमध्ये हायवे ट्रफिक उतरण्याचे ठिकाण हे कोयना नदीअलिकडेच पाहिजे आणि ते म्हणजे झीरो लेवल 682.300 KM स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्वागत कमानी पुढे, कोयना नदीच्या अलीकडेच शहर हद्दीत हवे.
हीच ती योग्य वेळ….
कराड शहराचे अस्तित्व आणि अस्मिता टिकवण्याचा आज हाच तो क्षण आहे आणि म्हणून मी सर्व नागरिकांना आवाज देतो की चला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न सकारूया आणि शहरचे अस्तित्व अबाधित ठेवू. याबाबत सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून लढा देणे आवश्यक असल्याने आम्ही आज कृती समिती स्थापन केली असल्याचे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.