सातारा प्रतिनिधी । पोवई नाका हे साताऱ्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर सर्वांचे प्रेरणास्थान आहे. हे प्रेरणास्थान कायम शिवस्मारक म्हणूनच राहणे आवश्यक आहे. शिवप्रभूंपेक्षा दिगंत कीर्तीचे कोणी होईल किंवा कोणी असेल, असे वाटत नाही. याठिकाणी अन्य कोणाच्या नावाने काही करण्याचे कोणी धाडस करू नये. अधिकार गाजवून, तमाम जनतेच्या अस्मितेवर घाला घालण्याचा कोणी हीन प्रकार केल्यास तो जनतेच्या माध्यमातून हाणून पाडला जाईल, असा थेट इशारा माजी नगराध्यक्षा रंजना रावत यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्रकाद्वारे दिला आहे.
पोवई नाका परिसरात लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती साताऱ्याच्या माजी नगराध्यक्ष रंजना रावत यांना मिळाली. यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यासोबत त्यांनी संबंधित ठिकाणची पाहणी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी करण्यात येणाऱ्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धिपत्रक काढले.
छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात काही करण्याचं धाडस करू नका, अन्यथा…; माजी नगराध्यक्षांचा मंत्री शंभूराजेंना इशारा pic.twitter.com/WEySN3g2R4
— santosh gurav (@santosh29590931) June 14, 2023
यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, पोवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सर्वांचे आकर्षण आहे. या परिसराचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने नगर परिषदेच्या माध्यमातून सुशोभीकरण होत आहे. या परिसराचे नामकरण करत त्याठिकाणी आयलँड करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. लोककल्याणकारी शिवप्रभूंची तुलना अन्य कोणाशी होऊ शकणार नाही व तसा प्रयत्नही कोणी करू नये. या परिसरालगत छत्रपती संभाजी महाराज आणि शाहूनगरीचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची स्मारके उभारण्याची त्यांची संकल्पना असल्याची माहिती रंजना रावत यांनी पत्रकात दिली आहे.
पोवई नाक्यावर होणार बाळासाहेब देसाई चौक
सातारा शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पोवई नाका परिसरात लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. या बैंठकीत नेमका काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.