कराड मधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. कराडचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि माजी क्रीडा मंत्री शामराव आष्टेकर (वय ९१) यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले. राज्याच्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण होतं. विशेषतः पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
शामराव आष्टेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत अनुयायी म्हणून ओळखले जात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कराड आणि सातारा परिसरातील क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं. त्यांच्या निधनामुळे कराड आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय व क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
२ वेळा आमदार –
शामराव आष्टेकर यांनी १९८५ आणि १९९० अशा २ वेळा कराड उत्तरचे प्रतिनिधित्व केलं होते. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. कराडच्या स्थानिक राजकारणावरही त्यांची एकेकाळी पकड होती. आज सायंकाळी ६:३० वाजता वैकुंठधाम नवीपेठ पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.