कराड प्रतिनिधी | राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी राजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत एल्गार पुकारला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार होते. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही कराडला आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते अजूनही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांना फोन करून आम्हाला परत यायचं आहे. त्यामुळे याबाबत एक दोन दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये आलेले दिसतील, असे देशमुख यांनी सांगितले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर सुमारे अर्धा तास कमरा बंद चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले की, आज गुरुपौर्णिमा असल्याने व खासदार शरद पवार यांचे गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शरद पवार यांनी महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास आजपासून सुरुवात केली आहे.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्रितच आहेत. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर माझी नुसतीच चर्चा झाली आहे. राज्यभर महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. पुढील सर्वच निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे इथून पुढे सर्व निवडणुकांमध्ये राज्यात व एकूणच देशांमध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल.
महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यांमध्ये व एकूणच देशभर ईडी व सीबीआयच्या कारवाईची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अशा परिस्थितीमध्येही आम्ही सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले होते. माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली आणि हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत, झालेले सर्व आरोप ऐकीव माहितीचे आहेत, असे प्रथम हाय कोर्टाने सांगितले. त्यावर नंतर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, असेही ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता आ. देशमुख यांनी सांगितले.