…म्हणून अजितदादांनी शरद पवारांसोबत बंड केले; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं नेमकं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट आज फुटला आहे. या फुटीर गटाला राष्ट्रवादीचा गट नाही तर ईडीचा गट असे म्हणावे लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे याचे नाव घेत 70 हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर दोनच दिवसात आज राष्ट्रवादीमध्ये फूट पडून अजित पवार व छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एक गट भाजपसोबत गेला. ज्या लोकांवर गंभीर आरोप आहेत त्यांना मंत्रीपदे बहाल केली असून हा राजकारणातील विरोधाभास आहे. ज्यांच्यावर ईडीची छत्रछाया होती, ते सर्वजण रात्री चांगली झोप लागावी म्हणून भाजपसोबत गेले असल्याचे कारण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण कराड येथे माध्यमाशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत गेला असला तरी राज्यात महाविकास आघाडी सर्व शक्तीनिशी जातीवादी पक्षांच्या विरोधात ठामपणे लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील एकूण संख्या 53 आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील 36 हून अधिक आमदार असणे आवश्यक आहे.

…तर अजितदादांसह फुटीर गट अपात्रतेच्या कचाट्यात सापडेल : चव्हाण

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत काही आमदारांनी भाजप-शिंदे गटासोबत गेले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. अनेक आमदारांनी संपर्क साधत आपण पक्षासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. जर खासदार शरद पवार यांच्यासोबत 20 आमदार ठामपणे उभे राहिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असेल. अजित पवार यांच्यासह फुटीर गट अपात्रतेच्या कचाट्यात सापडेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

ही तर पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या मुख्यमंत्री पदाची पूर्वतयारी…

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे विधान केले. दि. 10 ऑगस्ट पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय काय असेल हे सूर्य प्रकाशाइतके स्पष्ट असल्याने आता पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या मुख्यमंत्री पदाची पूर्वतयारी केली जात असल्याचे आ. चव्हाण यांनी म्हंटले.