कराड प्रतिनिधी । भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आ. शिवराजसिंह चौहान आज सातारा लोकसभेच्या दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी कराड येथे भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील भाजपाच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच महत्वाच्या सूचना देखील केल्या.
लोकसभा संपर्क अभियानाअंतर्गत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आ. शिवराजसिंह चौहान कोल्हापूर, हातकणंगले व सातारा लोकसभा दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर व हातकणंगले येथील सभेचा कार्यक्रम आटोपून सातारा येथील सभेसाठी जात असताना ते काहीकाळ कराड येथे थांबले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक देखील उपस्थित होते.
यावेळी आ. चौहान यांनी खा. महाडिक यांच्यासमवेत कराड येथील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्यासोबत महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यावेळी यावेळी आ. चौहान यांनी कराड दक्षिणमधील भाजपाच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात, अशा सूचना त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ. स्वाती पिसाळ, माजी जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, सचिन पाचुपते, पंकज पाटील, वसीम मुल्ला, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरज शेवाळे, भाजपा महिला मोर्चाच्या डॉ. सारिका गावडे, मंजिरी कुलकर्णी, सुरेखा माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.