सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागात घोरपड, ससे सारख्या प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या शिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, फलटण तालुक्यातील ढवळेवाडी (नेवसेवस्ती) येथील ढवळेवाडी-नांदल मार्गावर मांस खाण्याच्या उद्देशाने तीन संशयितांनी वन्यप्राणी घोरपडीची शिकार केली. आणि पुढे जातो तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडल्याची घटना घडली आहे.
दत्तात्रय शंकर रनवरे (वय ४८), मोहन नानबा माने (३८), शरद हणमंत नेवसे (४०, सर्वजण ढवळेवाडी, ता. फलटण) असे वनविभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, ढवळेवाडी, ता. फलटण येथील वरील संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २. (१६) ९५०, ३९, ५० अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून शिकार करण्याकामी वापरण्यात आलेले साहित्य लाकडी ओंडका, कोयता, पातेले, डबा व वन्यजीव घोरपडचे कातडे, नख्या, शिजवलेले मांस ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव, मनोहर म्हसेकर, वनपाल राजेंद्र कुंभार, वनपाल राजेंद्र आवारे, वनरक्षक विक्रम निकम, राहुल निकम, सारिका लवांडे यांनी बुधवारी हि कारवाई केली. अधिक तपास साताऱ्याचे उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल फलटण करीत आहेत.