पाटण प्रतिनिधी | काळवीटाच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या चौघांना वन विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून काळवीटाची चार शिंगे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पाटणमधील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाकडून काळवीटाची शिंगे आणली असल्याची कबुली संशयितांनी दिल्यामुळे त्याचाही तस्करीत सहभाग असल्याचा संशय वन विभागाला आहे.
कराड-पाटण मार्गावर सापळा रचून संशयितांना पकडले
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, चौघेजण काळवीटाच्या शिंगाची तस्करी करण्यासाठी पाटण तिकाटणे येथे येणार आहेत. या माहितीच्या आधारे कराडचे वनक्षेत्रपाल, वराडेचे वनपाल आणि कर्मचाऱ्यांनी पाटण तिकाटणे (वारूंजी फाटा) परिसरात सापळा रचला. अन्नपूर्णा हॉटेलसमोर दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी आणखी दोघांचा तस्करीत सहभाग सांगितले. त्यानुसार अन्य दोघांनाही वन विभागाने ताब्यात घेतले.
इस्लामपूर, कराडमधील चार तस्करांना अटक
काळवीटाच्या शिंगाची तस्करी केल्याप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी रत्नाकर हणमंत गायकवाड, रा. इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली), अमर भगवान खबाले, इलाई सय्यद शेख, विशाल संभाजी शिंदे (तिघेही रा. कराड) यांना अटक केली. आहे. पाटण येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त रेल्वे पोलीस चंद्रशेखर भिकाजी निकम याच्याकडून काळवीटाची शिंगे मिळाली असल्याची माहिती संशयितांनी दिली आहे.
टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन
साताऱ्याच्या उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारव्दाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झाझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयितांवर वन्यजीव अधिनियमन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल टी.डी. नवले, आर. एस. नलवडे, सागर कुंभार, वनपाल आनंदा जगताप, बाबुराव कदम, सचिन खंडागळे, वनरक्षक शीतल पाटील, अभिजीत शेळके, सुभाष गुरव, शंकर राठोड, कैलास सानप यांनी ही कारवाई केली. वन्य प्राण्यांची शिकार अथवा तस्करी होत असल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.