कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या महसूल विभागांमार्फत राज्यात दि. 1 ऑगस्ट पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत एक हात मदतीचा हा कार्यक्रम राबविला जात आहे. स्थलांतरित अशा कुटूंबीयांना जीवनावश्यक वास्तूच्या किटचे वाटप केले जात आहे. या किटच्या माध्यमातून कुटूंबीयांना एक प्रकारे आधारच मिळत आहे.
महसूल सप्ताह अंतर्गत सातारा तालुक्यातील मेरावाडी येथे एक हात मदतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार राजेश जाधव, पुरवठा निरीक्षक मकरंद साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी स्थलांतरित कुटुंबाना भारतीय जैन संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष भतेश गांधी व परेश ओरा यांच्या सौजन्याने उपलब्ध करून दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या 30 किटचे वाटप मोरेवडीतील कुटूंबाना करण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मोरेवाडी येथे 3 महिन्यांचा शिधा ही वाटप करण्यात आला. उपविभागीय अधिकारी सातारा यांनी दरडी कोसळण्याच्या अनुषंगाने पूर्वसंकेत व खबरदारीच्या उपययोजना या अनुषंगाने गावकऱ्यांशी सुसंवाद साधला व मार्गदर्शन केले. दरड प्रवण क्षेत्रातील लोकांना स्थलांतरित केलेल्या तात्पुरत्या निवारा पत्राशेड येथे भेट देऊन लाईट पाणी या मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी प्रशासनाने तत्काळ करून दिलेल्या सुविधांबद्दल बद्दल आभार व्यक्त केले.