सातारा प्रतिनिधी । सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडून पडली आहे. दोन महिन्यांपासून उद्भवलेल्या समस्येवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळ रेशन धान्य वितरक संतप्त झाले आहेत. दुकानदारांनी ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत.
राज्यातील रेशनवरील धान्य वितरण सर्व्हर डाऊनमुळं कोलमडलं आहे. यावरून रेशन दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. माण तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवानराव गोरे यांच्या नेतृत्वाखाली १३९ स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवारी ई-पॉस मशीन थेट तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत. विशेष म्हणजे भगवान गोरे हे भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे वडील आहेत.
रेशन दुकानदार-कार्डधारकांमध्ये वादावादी
माण तालुका हा दुष्काळी तालुका आहे. दररोज सव्र्व्हरची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे रेशन कार्डधारक आणि दुकानदारांमध्ये वादावादी होत आहे. कार्ड धारकांना धान्य वितरण करता येत नसल्याने लोक रोज दुकानांमध्ये हेलपाटे मारत आहेत. यावर शासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी माण तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवानराव गोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच ई-पॉस मशीन बॉक्समध्ये भरून तहसील कार्यालयात जमा केल्या आहेत.
आमदारांच्या वडिलांनी केल्या ‘या’ मागण्या
माण तालुक्यात जुलै महिन्यातील धान्याचे ७० टक्के वाटप झालेले नाही. जुलैमधील धान्य वाटपाची मुदत ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी. जुलै व ऑगस्ट महिन्यातील धान्य वाटप एकाच पावतीवर काढलं जावं. गोडाऊनमधून दुकानदारांकडे येणारी धान्याची पोती फटकी असतात. त्यामुळे वाहतुकीवेळी आणि धान्य वितरणावेळी धान्य सांडते. यामुळे दुकानदारांना प्रत्येक पन्नास किलोच्या पोत्यामागे 500 ग्रॅम तुट घालण्यास परवानगी मिळावी, अशा मागण्या भगवानराव गोरे यांनी निवेदनात केल्या आहेत.