सातारा प्रतिनिधी । मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारला जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आठ दिवसांपासून तापमानात घसरण होऊ लागल्याने थंडीचा कडाका वाढू लागला आहे. या कडाक्याच्या थंडीसोबतच गार वारेही वाहू असल्याने पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिक नागरिक थंडीत गारठले आहेत. रात्रीच्यावेळी शेकाेट्या पेटू लागल्या असून सातारा शहराचा पारा मागील काही दिवसांपासून १५ अंशाच्या खाली कायम आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शहरामध्ये किमान १२ ते १४ अंश तापमानाची नोंद होत असून, वेण्णा लेक परिसरात त्याहून तापमानाची कमी नोंद होत असते. थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने सकाळी वेण्णा लेकवर पर्यटक अपवादानेच फिरकत आहेत. कडाक्याची थंडी ही महाबळेश्वरची नजाकत दाखवत असून, या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. महाबळेश्वर सोडून काही किलोमीटर अंतर सोडून गेल्यावर बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असलेली गुलाबी थंडी यातील फरक पर्यटक अनुभवत आहेत.
सायंकाळी पर्यटकांसह स्थानिकही थंडीपासून बचाव होण्यासाठी स्वेटर, कानटोपी, जॅकेट्सचा आधार घेताना पाहावयास मिळत आहेत. लिंगमळासह शहरातील विविध भागांमध्ये स्थानिकांसह पर्यटक हे शेकोटी पेटवताना पाहावयास मिळत आहेत. जिल्ह्यात यावर्षी थंडीला उशिरा सुरूवात झाली. दरवर्षी नोव्हेंबरला सुरूवात होण्यापूर्वीच थंडीची चाहूल लागते. पण, यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतर थंडी पडण्यास सुरूवात झाली. मागील काही दिवसांपासून तर पारा सतत खाली जात चालला आहे. त्यामुळे लोकांच्या जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. आठवड्यातच किमान तापमान १५ अंशाच्या खाली गेले आहे.