सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट असून उन्हाचा पारा कमालीचा असताना महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात महाबळेश्वर मात्र धुक्यात हरवलंय. वातावरणातील बदलामुळे महाबळेश्वरात सकाळी आणि सायंकाळी धुक्याची दुलई पसरत आहे. अशा गुलाबी थंडीचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. वेण्णा लेकमधील नौका विहारासह विविध पॉईंटवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
उन्हाळी सुट्टीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजून गेलं आहे. महाबळेश्वरातील सिडनी पॉईंट, पारसी पॉईंटवरील गारवा पर्यटकांना सुखावून जात आहेत. वळीव पावसामुळे हिरव्यागार झालेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.
यंदा कडक उन्हाळ्यामुळे महाबळेश्वरात गेली दोन महिने पर्यटकांनी गजबजून गेलंय. परंतु, महाबळेश्वरतही उन्हाचा पारा वाढला होता. मागील आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. सकाळी आणि संध्याकाळी महाबळेश्वर परिसरावर धुक्याची दुलई पांघरत आहे. धुक्यामुळं महाबळेश्वरचं सौंदर्य खुललं आहे. पर्यटकांना या सौंदर्याने भुरळ घातली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायात कोटींची उलाढाल झाली आहे. लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे हॉटेल, रिसॉर्टचं बुकिंग हाऊसफुल्ल झालं होतं. बाजारपेठ पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजत आहे. स्थानिकांना देखील यंदा चांगला रोजगार मिळाला. प्रसिद्ध वेण्णा लेकवर हजारो पर्यटक नौका विहाराचा आनंद लुटत आहेत. महाबळेश्वर लगतचं पाचगणी टेबल लॅंड देखील पर्यटकांनी गजबजलंय.