साताऱ्याच्या नायगावात सावित्रीबाई फुलेंचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार; अर्थमंत्री अजितदादांची अर्थसंकल्पात घोषणा

0
349
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचा 2025-26 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) अर्थमंत्री अजित पवारांनी आज सोमवारी सादर केला. अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पमध्ये राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी अर्थसंकल्पात महत्वाची तरतूद करण्यात आली असून आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पीय भाषणात पर्यटन धोरणही जाहीर केले. महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा, प्राचीन लेण्या, गडकिल्ले, घनदाट वनसंपदा असा समृध्द वारसा लाभला आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरीता “पर्यटन धोरण-2024” जाहीर करण्यात आले आहे. येत्या 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. राज्याचे आरोग्य पर्यटन धोरणही आखण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव येथे दहा एकर क्षेत्रात १०० कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193 वा जयंती सोहळा निमित्त केली होती.

सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा अशा आहे इतिहास

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी क्रांतिकारक बदल घडवून आणले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात झाला. सावित्रीबाईंचे वडील खंडोजी नेवसे यांच्याकडे त्यावेळी नायगावची पाटीलकी होती. नेवसे पाटलांच्या वाड्यात 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढील अनेक वर्षे या वाड्याची दुरवस्था होऊन सावित्रीबाईंच्या जन्माचे ठिकाण विस्मृतीत गेले होते. मात्र, पुन्हा या वाड्याचा जिरृणोद्धार करण्यात आला आणि एकोणीसाव्या शतकात जशी वाड्याची रचना होती, तशा स्वरुपात हा वाडा पुन्हा उभा करण्यात आला आहे. खंडोजी नेवसे पाटील यांच्या या राहत्या घरी 1840 साली जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. 1848 साली त्या दोघांनी पुण्यात शाळा उघडून स्त्रिया आणि दलितांना शिक्षणाची दारे खुली केली. सावित्रीबाई या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत.

राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित

1890 साली जोतीरावांच्या मृत्यूनंतर या सर्व चळवळीचे नेतृत्त्व त्यांच्याकडे आले. 1897 साली प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करत असताना खुद्द त्यांनाच प्लेग होऊन त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 रोजी अंत झाला. क्रांतिज्योति सावित्रीबाईच्या या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. या वास्तूची तत्कालीन वास्तुस्वरुपानुसार पुर्नउभारणी करण्यात आली आहे.

अजित पवारांकडून स्मारकांची घोषणा

शिवाजी महाराजांचे आग्र्यामध्ये स्मारक

मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी केली.

संभाजी महाराजांचे संगमेश्वरात स्मारक

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

तुळापूर आणि मौजे वढु बुद्रुक स्मारकाचे काम प्रगतीपथावर

छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे.

पानिपतमध्ये मराठा शौर्याचे स्मारक

स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.

मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक

भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी निधी

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्‍प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून 220 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे नायगावात स्मारक

आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

लहुजी साळवेंचे पुण्यात स्मारक

संगमवाडी, पुणे येथील वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे.

आण्णाभाऊ साठे यांचे सांगलीत स्मारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नांवे प्रस्तावित चिरागनगर, मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.