सातारा प्रतिनिधी । पावसाळा म्हणजे थंडगार ओलेचिंब असे वातावरण, सगळीकडे मोहून टाकणारा हिरवा निसर्ग होय. या पावसाळा हंगाम हा रानफुलांचा हंगाम. पाऊस कोसळू लागला, की हिरवाईपाठोपाठ त्यावर उमलणारी ही लक्षावधी गवतफुले सह्याद्रीत सर्वत्र उमलतात. यंदा पावसाबरोबरच या रानफुलांनाही थोडासा उशिरा बहर आला आहे. एकीकडे मान्सूनच्या पावसाचा अद्याप जोर सुरू झाला नसला तरी अवकाळी पावसामुळे जून महिन्याची सरासरी सातारा जिल्ह्यासाठी आत्ताच पूर्ण झाली आहे. सातारा शहराच्या दक्षिण बाजूस असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर सध्या पांढऱ्या, नारंगी रंगाची गवतफुले अक्षरशः पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
गवत फुलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर अतिशय छोट्या आणि नाजूक प्रकारची ही फुले सात ते आठ दिवस उमलतात आणि नाहीशीही होतात. सध्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी पर्यटकांचे अजिंक्यतारा किल्ल्यावर येणे – जाणे सुरूच असल्यामुळे पर्यटकांना हा आगळावेगळा गवत फुलांचा नजारा कास पठार फुलण्याअगोदरच पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्याचे नाव हे तिथे असणाऱ्या सात किल्ल्यांवरून पडल्याचे समजते. यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे अजिंक्यतारा. या किल्ल्यावर आणि आजूबाजूला अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. या ठिकाणी पर्यटक पावसाळ्यात मोठ्या संखेने भेटी देण्यासाठी येतात. अशा हंगामात सध्या या ठिकाणी पांढऱ्या, नारंगी रंगाची गवतफुले उमळत आहेत. ही फुले पर्यटकांना आकर्षीत करत आहरेत.