सातारा प्रतिनिधी | शिवजयंतीदिनी आज, दि. 19 रोजी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्यावतीने शाही शिवजयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवतीर्थावर सोमवारी सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवरायांची महारती करण्यात आली असून, शंभर फुटी ध्वजाचे आरोहण ‘नक्षत्र’च्या अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती शिवरायांची 394 वी जयंती शहरात विविध उपक्रमांनी साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आज सोमवारी सकाळपासून शिवज्योती येण्यास सुरुवात झाली असून, त्यांच्या स्वागतासाठी पोवई नाक्यावर कक्ष उभारण्यात आला आहे. शिवजयंतीसाठी शिवतीर्थासह शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवतीर्थावर शंभर फुटी ध्वजाच्या आरोहण आज ‘नक्षत्र’ समूहाच्या अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी सातारा विकास आघाडीचे सदस्य आणि उदयनराजे भोसले मित्रसमूहाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यासाठी जिल्ह्यातील पाच नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. शिवतीर्थाच्या सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, आठ कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. शिवतीर्थाचा परिसर भगव्या झेंड्यांनी सुशोभित करण्यात आला आहे.