मायणी तलावाकडे फ्लेमिंगोची पाठ; आगमन न झाल्याने पक्षीप्रेमींमध्ये निराशा

0
131
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील मायणी तलाव हे एक प्रमुख पक्षी निरीक्षण स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो पक्षी येत असत. मात्र, यंदा उन्हाळ्याच्या आगमनासह फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरवली असल्याने पक्षीप्रेमींची निराशा झाली आहे. हे पक्षी दिवाळीच्या सुमारास येथे दाखल होत असत आणि सुमारे तीन महिने येथे वास्तव्य करत असत. त्यांच्या दुर्मिळ दर्शनाने पक्षी निरीक्षकांसाठी हा काळ एक पर्वणीच असायचा.

मायणी व येरळवाडी तलाव परिसरात फ्लेमिंगो हे परदेशी पाहुणे पक्षी स्थलांतरित होत असत. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू होती. सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा येथून पक्षीप्रेमी येथे फ्लेमिंगो पाहण्यासाठी येत असत. ते रात्रीच्या मुक्कामानंतर सकाळी तांबडे फुटताच तलाव परिसरात हजर होत असत. फ्लेमिंगोंचे दर्शन होण्यासाठी ते लपतछपत तलावाच्या कडेकडेने पुढे सरकत असत. अचानक तलावात विहार करणाऱ्या फ्लेमिंगोचा थवा दृष्टीस पडत असे आणि कडाक्याची थंडी कुठच्या कुठे गायब होत असे.

तासन्‌तास मनसोक्त पक्षी निरीक्षण करीत सोबत आणलेल्या कॅमेऱ्यात त्यांची छबी टिपली जात असे. राज्यातील इतर पाणस्थळी दाखल झालेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी आता परतीच्या प्रवासास सुरुवात केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे मायणी तलावात आता फ्लेमिंगो येणार नसल्याने पक्षीप्रेमींचा हिरमोड झाला आहे.