सातारा प्रतिनिधी । मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील किमान उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, शैक्षणिक विकासास हातभार लावणे, त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणे आदी विविध उद्देशाने प्रेरित होऊन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण विकास व प्रशिक्षण मानव विकास (सारथी) संस्था (पुणे) काम करते. संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी जातीच्या जिल्ह्यातील ५ हजार ८०७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ५ कोटी ५७ लाख ४७ हजार २०० रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणारा राज्यातील सातारा हा जिल्हा पहिला असल्याचे मानले जात आहे.
इयत्ता आठवीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विकास (एनएमएमएस) परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यास इयत्ता बारावीपर्यंत प्रतिवर्षी ९ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती या नावाने शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत असते. त्यासाठी शाळांकडून प्राप्त झालेल्या विहित नमुन्यातील प्रस्तावांची छाननी करण्यात येते. आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करून घ्यावी लागते.
मात्र, त्यासाठी ‘सारथी’कडे पुरेसे मनुष्यबळ नाही. लवकरात लवकर प्रस्ताव पाठविणे तसेच ते शिष्यवृत्ती देण्यासाठी पात्र ठरणे, यासाठी जिल्ह्यात काही शिक्षकांनी स्वतःहून पुढाकार घेत समन्वयक म्हणून कामे केली. त्यासाठी, सारथीच्या कोल्हापूर उपकेंद्रातील कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयकांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा झाल्याची खातरजमा करून घ्यावी, प्राप्त शिष्यवृत्तीचा उपयोग आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास करण्यासाठीच करावा, असे आवाहन सारथीचे कार्यकारी अधिकारी (शिक्षण) डॉ. पाटील यांनी केले आहे. सारथीचे जिल्हा समन्वयक विजयकुमार शिर्के, सर्व तालुका समन्वयक, शाळांचे मुख्याध्यापक या सर्वांनीच मेहनत घेत वेळेत सर्व कामे पूर्ण केली.