कराड प्रतिनिधी | सातारा बाजूकडून कराड शहराच्या दिशेने निघालेल्या कारमधून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे सोने आणि चांदीची वाहतूक केली जात असताना पोलिसांकडून ती पकडण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संबंधित कार तसेच सोने व चांदी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका येथेही पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच याठिकाणी एका जीपमधून १५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री एका कारचा संशय आल्यामुळे पोलिसांनी ती कार अडवली. झडती घेतली असता कारमध्ये सुमारे ४ कोटी ९० लाख रुपयांचे सोने तसेच ५७ लाख रुपयांची चांदी आढळून आली.
तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकाने सोने, चांदी तसेच संबंधित कार ताब्यात घेतली. राज्यातील एका बड्या सोने व्यापाऱ्याचे हे सोने असल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, याबाबतची माहिती पोलिसांकडून आयकर खाते तसेच जीएसटी खात्याला देण्यात आल्यानंतर रात्री उशिरा आयकर विभाग आणि जीएसटी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तळबीड पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत. हे सोने संबंधित व्यापाऱ्याचे आहे का, तसेच ते रीतसर आहे का, हवालासाठी या सोने-चांदीचा उपयोग केला जाणार होता का? याबाबतची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.