कराड प्रतिनिधी | कराड येथील प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ आणि इंटरव्हेन्शल कार्डिओलॉजीस्ट डॉ. विजयसिंह पाटील यांच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये ह्रदय रूग्णावर ‘टावी’ (ट्रान्स कॅथॅटर अवॉर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट) ही गुंतागुंतीची जिल्ह्यातील पहिली शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. विशेष म्हणजे भूल न देता आणि कोणतीही चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती डॉ. विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. राजाराम पाटील, डॉ. दिलीप सोलंकी उपस्थित होते.
ह्रदयात बसवली कृत्रिम झडप
डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले की, वयोवृध्द हृदयरोगी व्यक्तींवर प्रचलित बायपास शस्त्रक्रिया करणे काही वेळा धोक्याचे ठरू शकते, याचा विचार करून ओपन हार्ट सर्जरी ही शस्त्रक्रिया टाळून ट्रान्सकॅथेटर अवॉर्टिक व्हाल्व रिप्लेसमेंट (टावी) ही अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया रुग्णास भुल न देता तसेच कोणीही चिरफाड न करता आम्ही यशस्वी केली. या शस्त्रक्रियेद्वारे मसूर (ता. कराड) येथील प्रसिध्द ज्योतिष विशारद ज्ञानेश्वर भोज (वय वर्ष 88) यांच्या हृदयामध्ये कृत्रिम झडप बसवण्यात आली. अशा प्रकारची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील पहिलीच घटना आहे.
टावी शस्त्रक्रियेशिवाय नव्हता पर्याय
ज्ञानेश्वर भोज यांना गेल्या काही वर्षांपासून रक्तदाब, धाप लागणे, चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास होत होता. 2019 मध्ये पहिल्यांदा केलेल्या तपासणीत अवॉर्टिक व्हाल्व स्टेनॉसिस म्हणजेच त्यांच्या हृदयाची एक झडप पूर्णपणे उघडत अथवा बंद होत नसल्याचे आढळून आले. ती झडप बदलणे महत्वाचे होते. जास्त वय आणि कमी वजनामुळे त्यांची बायपास शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘टावी’ शस्त्रक्रिया करून घेण्याचा त्यांना सल्ला दिला होता. मात्र, शस्त्रक्रिया करून घेण्याची त्यांची मानसिकता नव्हती. नंतर त्रास वाढल्यामुळे त्यांनी आमच्याकडे उपचार सुरू केले. यावर टावी शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची मानसिकता झाली. नुकतीच संजीवन मेडिकल सेंटरमध्ये त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याचे डॉ. विजयसिंह पाटील यांनी सांगितले.
अशी झाली शस्त्रक्रिया…
हृदयातील खराब झालेल्या अवॉटिक व्हाल्वच्या (झडप) जागी कॅथेटरच्या सहाय्याने कृत्रिम झडप बसवण्यात आली. यासाठी एक छोटे छिद्र घेऊन कॅथेटर हृदयापर्यंत नेण्यात आला व झडप बदलण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण ठणठणीत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाणार आहे. बहुतांश हृदय शस्त्रक्रिया या रुग्णास भुल देऊन व चिरफाड करून केल्या जातात. परंतु, संजीवन मेडिकल सेंटरमध्ये प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे रुग्णास भुल न देता आणि चिरफाड न करता ही शस्त्रक्रिया करता आल्याचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी सांगितले.
शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रूग्ण चालू लागला
शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रुग्णाने चालणे-फिरणे सुरू केल्याचे सांगून डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, अशा प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. संजीवन मेडिकल सेंटरचे चेअरमन डॉ. आर. एन. पाटील, प्रसिध्द भुलतज्ज्ञ डॉ. सुहास पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. योगिता पाटील, डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. देवरे, डॉ. दिलीप सोळंकी, स्वप्नील साळुंखे व संजीवन मेडिकल सेंटरचा स्टाफ यांचे या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य लाभले. हृदय रोगावरील उपचारामध्ये संजीवन मेडिकल सेंटरने आशेचा किरण निर्माण केला आहे. डॉ. पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात हृदयाच्या अनेक गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने त्यांचा वैद्यकीय क्षेत्रात मोठा लौकिक आहे.
2 दिवसाच्या बालकाच्या ह्रदयावरही शस्त्रक्रिया
काही वर्षापूर्वी डॉ. विजयसिंह पाटील यांनी दोन दिवसाच्या बालकाच्या हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी केली होती. या बालकास जन्मताच धाप लागण्याचा त्रास होता. त्याचे निदान करून लगेचच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज ते बालक सात वर्षांचे असून त्याला आता हृदयाच्या संदर्भातील कसलाही त्रास नाही. या शस्त्रक्रियेबद्दल डॉ. विजयसिंह पाटील यांचा अमेरिकेत सन्मान देखील झाला होता.