सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकलेल्या धोम धरणाच्या पाण्याच्या पहिल्या रोटेशनबाबत अखेरीस जलसंपदा विभागाने निर्णय घेतला आहे. धोम धरण पाणी बचत संघर्ष समितीने केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडले जाणार आहे. वाई, जावळी, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
यासंदर्भात धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित शिवाजीराव फाळके यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे धोम धरण शंभर टक्के भरले आहे. साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यानंतर धरणातून पहिले रोटेशन सोडावे, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देऊन जलसंपदा विभागाने त्याबाबत कार्यवाही केली नव्हती. शेतकऱ्यांच्या ऊस पिकासह अन्य पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने तातडीने पहिले रोटेशन सोडावे, यासाठी समितीने पाठपुरावा केला होता. अखेरीस सातारा सिंचन मंडळाचे अध्यक्ष अभियंता जयंत नाईक व कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी पहिले रोटेशन सोडत असल्याचे स्पष्ट केले आहे, तसे त्यांनी समितीला कळविले आहे.
धोम धरणातून पहिले रोटेशन सोडण्यात येत असल्याने धोम डाव्या कालव्यावर असलेल्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन रणजित शिवाजीराव फाळके व सचिव नंदकुमार माने पाटील यांनी केले आहे.