सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱया ‘माझी वसुंधरा’ अभियानात तसेच ‘भूमी थिमॅटिक’ उपक्रमात सातारा नगरपालिकेने पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही श्रेणींत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल नगरपालिकेस आठ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा चौथा टप्पा सुरू असून, यात सातारा नगरपालिकेने सहभाग नोंदवला होता. सहभाग नोंदवल्यानंतर रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा प्रकल्पासह इतर पर्यावरणपूरक प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला होता. ‘माझी वसुंधरा अभियाना’चा निकाल शासनाच्या वतीने जाहीर केला. 1 ते 3 लाख लोकसंख्येच्या निकषात या गटात साताऱयासह 13 नगरपालिकांचा सहभाग होता.
यात सातारा नगरपालिकेने बाजी मारत पहिला क्रमांक मिळवला. ‘माझी वसुंधरा अभियाना’त नगरपालिका सातत्यपूर्ण कामगिरी करत आली आहे. यापूर्वीही नगरपालिकेने देश व राज्य पातळीवर आपला लौकिक उंचावला आहे. याही पुढे नगरपालिकेच्या कार्याचा आलेख उंचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले.
पाटणमधील मान्याचीवाडीला 1 कोटींचे बक्षीस
‘माझी वसुंधरा अभियाना’त दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले आहे. ‘माझी वसुंधरा अभियाना’त राज्यातील 22 हजार 218 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यामध्ये मान्याचीवाडी गावाने दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक कोटीचे बक्षीस प्राप्त केले आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मान्याचीवाडी गावाचे अभिनंदन केले.