कुणबी दाखल्यांच्या अडचणी सुटणार; मराठ्यांचे राज्यातील पहिले जनसंपर्क कार्यालय कराडात सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम वेगाने सुरू आहे. महसूल दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी नोंदींसंदर्भात लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर व्हावी आणि कुणबी दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी कराडमधील कराड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. राज्यातील हे पहिलं जनसंपर्क कार्यालय असून तहसील कार्यालय परिसरात हे कार्यालय आहे.

कुणबी दाखला काढताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयातून प्रयत्न होणार आहेत. आज अखेर कराड तालुक्यात ११ हजार ९७९ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यातील जवळपास ४ हजार २३४ नोंदी मराठी भाषेत आहेत. ७ हजार ७४५ दाखले मोडी लिपीत आहेत.

कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या नोंदी सापडत आहेत. मात्र, त्याची गावनिहाय नावे समजण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मराठा समाज बांधवांच्यात संभ्रमावस्था निर्माण होत आहे. ती दूर करण्यासाठी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आहे. त्याद्वारे कुणबी दाखले काढण्या संदर्भातील अडचणी दूर करण्यात येणार आहेत.

मागील महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत देत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यातील गावोगावी साखळी उपोषण सुरू आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना शुक्रवारी कराडमध्ये कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

मराठा समाज बांधवांना होणारा त्रास कमी करणे, ज्या मराठा बांधवांचे पूर्वज कुणबी म्हणून नोंदवले गेले आहेत अशा मराठा बांधवांना कुणबी दाखले काढताना होणारा त्रास दूर करणे या हेतूने कराडमध्ये तहसील कार्यालय परिसरातील कराड अर्बन बँकेच्या तळभाग शाखेनजीक जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

मोडी लिपी येणाऱ्यांनी सहकार्य केल्यास मानधन…

कराड तालुक्यात ११ हजार ९७९ दाखले सापडले असून, त्यातील ४ हजार २३४ दाखले मराठीतील असून, सात हजार ७४५ दाखले मोडी लिपीत आहेत. मोडी लिपी वाचता येणारा एकच व्यक्ती असून, त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे मोडी लिपी कोणास वाचता येत असेल, तर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी संबंधितांनी पुढे यावे, अशा लोकांना योग्य ते मानधनही दिले जाईल, असे कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्व्यकाकडून सांगण्यात आले आहे.

कराडातील जनसंपर्क कार्यालयात नेमकं काय काम होणार?

कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले काढताना अथवा आपल्या पूर्वजांचे नाव कुणबी म्हणून नोंद आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारावे लागतात ते आता लागणार नाहीत. कारण कराड येथील जनसंपर्क कार्यालयात ती मिळणार आहे. मराठा समाज बांधवांना होणारा त्रास कमी करणे, ज्या मराठा बांधवांचे पूर्वज कुणबी म्हणून नोंदवले गेले आहेत, अशा मराठा बांधवांना कुणबी दाखले काढताना होणारा त्रास दूर करणे हे काम या कार्यालयातून केले जाणार आहे. कुणबी दाखल्यासंदर्भात मराठा समाज बांधवांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.