घरकुलच्या 25 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता! जिल्ह्यात आज सर्व तालुक्यात कार्यक्रम

0
639
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सातारा जिल्ह्यात प्रतीक्षा यादीतील ३६ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यामधील २५ हजार लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ४९२ ग्रामपंचायतींमध्येही विशेष ग्रामसभा होत आहे. सातारा येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी ४ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सातारा जिल्ह्यात ४५ हजारांहून अधिक घरकुले मंजूर झालेली आहेत. यामधील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला १५ हजार रुपयांचा हप्ताही वर्ग केला जाणार आहे. याचा राज्यस्तरावरील कार्यक्रम पुणे येथे होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या प्रमुख उपस्थितीत या अभियान अंतर्गत २० लाख घरकुलांना मंजुरी तर १० लाख लाभार्थींना घरकुलाचा पहिला हप्ता वितरण होत आहे. सातारा येथे जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी ४ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. साताऱ्यात होत असलेल्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीद उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात १० घरकूल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यात एकाचवेळी हजारो घरकुलांना मंजुरी आणि पहिला हप्ता मिळणार आहे.