कराड प्रतिनिधी | कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या पाठीमागील बाजूस महाविद्यालयीन युवकांकडून आग लावण्याचा प्रकार आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला. समाधि स्थळाच्या पाठीमागील वृक्षांना आग लावण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, दोन तासानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग अटोक्यात आणली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील कृष्णा व कोयना नदीकाठी प्रीतिसंगम परिसरात यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. या ठिकाणी स्माधिस्थळाच्या पाठीमागील बाजूस कोयना नदीपत्रालगत झाडे झुडपे आणि वृक्ष आहेत. या ठिकाणी सकाळी व सायंकाळच्या सुमारास महाविद्यालयीन युवक व नागरिक फिरण्यासाठी येतात. मात्र, सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास काही महाविद्यालयीन युवकांनी आग लावली.
दरम्यान, हा प्रकार कराड शिवसेना शहराध्यक्ष शशिराज करपे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी संबंधित युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, युवक पळून गेले. याबाबतची माहिती त्यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन व समाधीस्थळ लगत असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांकडून आग विझविण्यात आली.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाचे पावित्र राखणे गरजेचे : शशिराज करपे
कराड येथील प्रीतिसंगम घाट परिसरात यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ आहे. या ठिकाणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक लोक, शाळाच्या सहली येतात. तसेच कराड शहरातील महाविद्यालयीन युवक – युवती देखील येतात. या ठिकाणी आल्यास समाधीस्थळ व परिसराचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत शिवसेना शहराध्यक्ष शशीराज करपे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना व्यक्त केले.