सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शॉर्ट सर्किटने लागली आग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या कॅज्युअलटी विभागातील पोर्चमध्ये असणाऱ्या मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. तेथे आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी कोणतीही मोठी घटना घडलेली नाही, आग नियंत्रणात आणली असल्याचे स्पष्ट केले.

सातारा शहरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोर पकडला आहे. शनिवारी सुद्धा साताऱ्यात पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. रात्री साडेनऊच्या दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या विभागासमोर असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये एका मीटर बॉक्समध्ये पाणी जाऊन अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे मीटर बॉक्सच्या बाहेर ठिणग्या उडून तेथे आग लागली आग लागली. आगीचे वृत्त कळताच तेथील आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर यांची एकच पळापळ झाली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ प्राचारण करण्यात आले.

1000674254

विभागातील काही डॉक्टर आणि वॉर्डबॉयनी अग्निशमन यंत्राच्या आधारे ही आग तात्काळ विझवली. मीटर बॉक्सच्या लगतचा एमसीबीचा खटका पाडून काही काळ रुग्णालय परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. अग्निशमन दलाचे वाहन पोहोचण्यापूर्वीच आग आटोक्यात आली होती. जिल्हा रुग्णालयातील सर्व मीटर बॉक्स सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.