पाचगणीत मध्यरात्री भाजीपाल्याच्या दुकानांना आग, 7 दुकाने जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पाचगणी, ता. महाबळेश्वर मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने व गोदामांना भीषण आग लागून बाजारातील सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडलयाची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत भाजीपाला आणि साहित्य जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांसह स्थानिक युवकांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ डॉ‌. बी.डी. सावंत मार्केट मधील भाजीपाल्याच्या दुकानांना काल रात्री पावणेबाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. दुकानात प्लास्टिक क्रेड व पोती असल्याने काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. या आगीत एकापाठोपाठ एक अशी एका ओळीतील ७ दुकाने जळून खाक झाल्याने भाजीपाला व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळेल आहे.

आग लागल्याची खबर मिळताच पालिका कर्मचारी व अग्निशमन बंब, पाण्याचा टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. आग लागल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन बंबाला अजय बोरा व महेंद्र बिरामणे यांच्या टॅंकरला असणाऱ्या डिझेल इंजिनच्या साह्याने पाणी पुरवठा करण्यात आला. पालिका कर्मचारी व स्थानिक युवकांनी दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.