कराड प्रतिनिधी । सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन विभागाच्या हद्दीतील डोंगर उतारावर अज्ञाताकडून आग लावण्याचे प्रकार केले जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात वन संपत्ती जाळून खाक होत आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागात दिवसभराची उन्हाची तिरीप यामुळे वन हद्दीत व खासगी डोंगर पायथा हद्दीत वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. दाढोली नजीकच्या मसुगडेवाडी येथे खाजगी जागेतील डोंगराला आग लावण्यात आली होती.आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र आग वनविभागाच्या हद्दीत गेल्याने अनेक औषधी झाडे व जंगली सरपटणारे प्राणी या आगीत होरपळले आणि वणव्यांमध्ये लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे.
दाढोली नजीकच्या मसुगडेवाडीमध्ये शुक्रवारी दुपारी मसुगडेवाडी येथील खाजगी क्षेत्रात असलेल्या डोंगराला काही समाजकंटकांनी आग लावली होती. ही आग वनविभागाच्या हद्दीत गेल्याने लाखो रुपयांची वनसंपदा जळून भस्मसात झाली आहे. वणवे लागू नयेत, यासाठी जागोजागी जाळ रेषा काढण्यात आल्या आहेत. मात्र, खासगी क्षेत्रातील जागेवर शेतकरी जाळ रेषा काढत नसल्याने एखाद्या वेळेस खाजगी क्षेत्रात आग लावल्यास ती वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात झपाट्याने जाते. त्यामुळे वन हद्दीतील वर्षभर चांगल्या प्रकारे वाढवलेली झाडे क्षणात जळून खाक होत आहेत.
आग लावणाऱ्याचा शोध घेण्यासाठी अपुरा कर्मचारी वर्ग वनविभागाकडे आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याने वणव्यांमध्ये झाडांचे नुकसान होत आहे. वन यंत्रणा वृक्ष लागवड वनसंपदा जळून खाक आणि अन्य तांत्रिक कामात अडकून पडल्याने आगी लावणाऱ्यांचा शोध घेणे जवळपास बंद झाल्यात जमा आहे. अनेक वेळा हुल्लडबाजांच्या जंगली भागातील जेवणावेळी कचरा पेटवला जातो आणि त्यामुळे वणवा लागतो. सर्व काही जळून खाक झाल्यानंतर वनविभागाला याची माहिती पडते. काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायी जावे लागते आणि या कालावधीत काही रोपे, दुर्मिळ झाडे भक्ष्यस्थानी पडतात.