कोळकीत फर्निचर मॉलला आग; लाखो रुपयाचे फर्निचर जळून खाक

0
281
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोळकी, ता. फलटण येथील फलटण-कोळकी रोड लगत असलेल्या एम एस फर्निचर मॉलला पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयाचे फर्निचर जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. फलटण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने आग आटोक्यात आणली.

फलटण-कोळकी मुख्य रोड लगत सोहेल खान यांच्या मालकीचे एम एस फर्निचर मॉल नावाचे दुकान आहे. या दुकानाला दि. 3 रोजी सकाळी सहाच्या दरम्यान अचानक आग लागली. शेजारच्या लोकांनी फर्निचर दुकान मालकांना फोन करून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. दुकान मालक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसेच आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. आग विजवेपर्यंत मोठ्या प्रमाणात फर्निचर साहित्य जळून खाक झाले. महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला. आगीत पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आग कशाने लागली हे निश्चित समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एक महिन्यापूर्वी बोरावके टॉवरला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागून दुकान जळण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.