सातारा प्रतिनिधी । शिखर शिंगणापूर येथील परिसरात अवैध व विनापरवाना माती उत्खनन केल्या प्रकरणी माणचे तहसीलदार विकास आहेर यांनी एकाला २२ लाख ८० हजार ९०० रुपयांचा दंड आकारला आहे. मुकुंद काशिनाथ बडवे (शिंगणापूर, ता. माण) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, की शिंगणापूर येथील पुष्कर तलावातील गाळ नेण्यासाठी ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांकडून महसूल आकारणी सुरू केली होती. यानंतर गाळ नेण्यासाठी ग्रामपंचायतीने माफक दरात करआकारणी करण्याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते, तसेच शिंगणापूर परिसरात माती तसेच अन्य गौणखनिजाचे अवैधरीत्या विनापरवाना उत्खनन होत असल्याच्या तक्रारीही महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.
यानंतर शिंगणापूरचे मंडलाधिकारी व तलाठी यांनी माती उत्खनन केलेल्या ठिकाणचा तसेच साठा केलेल्या ठिकाणचा पंचनामा केला. शिंगणापूर येथील गट नंबर- ५३१/६ मधील ३८५ ब्रास माती तसेच गट नंबर-६३८ मधील ६२ ब्रास माती अनधिकृतपणे उत्खनन करून त्याचा अवैधरीत्या साठा केल्याचा अहवाल स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी माण तहसीलदार विकास आहेर यांना सादर केला आहे. याबाबत ५३१/६ तसेच ६३८ या दोन्ही गट नंबरमधील ४४७ ब्रास मातीचे विनापरवाना माती उत्खनन तसेच अवैध साठा केल्याप्रकरणी माण तहसीलदार यांनी मुकुंद काशिनाथ बडवे यांना नोटीस बजावली आहे.