सातारा प्रतिनिधी | विधानसभेच्या रणधुमाळीला खर्या अर्थाने मंगळवार (दि. 22) पासून सुरुवात होत आहे. गावोगावी प्रचाराचा धुरळा उडला आहे. आता मंगळवारपासून उमेदवांराना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी (दि. 24) गुरुपुष्यामृत योग असून, अनेकांनी या मुहूर्तावर आपले अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. प्रशासनानेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन जय्यत तयारी केली असून, सर्व त्या सूचना दिल्या आहेत. निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होऊन सहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही अजून महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटप निश्चीत नाही. काही जागांवर एकमत असलेतरी अनेक जागांचा तिढाच आहे. त्यामुळे दावे-प्रतिदावे असणाऱ्या जागां वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यातच महायुतीत विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्याच पक्षाकडे राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपने पहिली यादी प्रसिध्द करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय.
तसेच कराड दक्षिणमध्ये भाजपने पुन्हा अतुल भोसले यांनाच पसंदी दिली आहे. आता मंगळवारपासून प्रत्यक्षात निवडणुकीला सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी कोण-कोण पुढे येणार हे पाहणे महत्वाचे आहे.
जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून आतापर्यंत भाजपचे तीन उमेदवार जाहीर झाले आहेत. सातारा, कऱ्हाड दक्षिण आणि माण मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही माण, कराड दक्षिण आणि कोरेगावच्या उमेदवाराची घोषणा केलेली आहे. यामधील कोण पहिल्या दिवशी अर्ज भरणार याकडेही लक्ष असणार आहे.