कराड प्रतिनिधी । चायनीज सेंटर दुकानातील टेबलवर विसरलेली दुचाकीची चावी आणण्याच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये जोरदार मारामारी झाली. यावेळी एकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना कराड तालुक्यातील सैदापूर येथील ओम साई कॉम्प्लेक्सनजीक सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवारे येथील चौंडेश्वरीनगरमध्ये राहणारा बबन अण्णा शिवाजी स्टेडियमनजीक राहणारा सनी चव्हाण हे दोघेजण मित्र आहेत. ते सैदापूर येथील ओम साई कॉम्प्लेक्सशेजारी असणाऱ्या चायनीज कॉर्नर यात दुकानात जात असतात. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते त्याठिकाणी गेले होतें. तेथे राईस खाल्ल्या नंतर पैसे देऊन ते दुकानाबाहेर आले.
त्याचवेळी टेबलवर दुचाकीची चावी विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती चावी आणण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद घालतच दोघे दुकानात आले. सनी चव्हाण याने टेबलवर विसरलेली चावी घेतली. त्यानंतर ते दोघेही दुकानातून बाहेर गेले. दुकानाबाहेर जाताच त्यांच्यात पुन्हा जोराचा वाद सुरू झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली.
बबन जाधव याने त्यावेळी त्याच्याजवळील चाकूने सनी चव्हाण याच्या कपाळावर तसेच पोटाच्या डाव्या बाजूला वार केले. त्यामध्ये सनी चव्हाण हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. या घटनेनंतर बबन जाधव हा चाकू घेऊन तेथून निघून गेला. परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत जखमी सनी चव्हाण याला रुग्णालयात दाखल केले. याबाबत चायनीज सेंटरवरील कामगार महेश श्रीरंग बोतालजी यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.