सातारा प्रतिनिधी । पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालचे महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. भाडेतत्वावर घेतलेल्या शासकीय मिळकतीवर अग्रवालने पंचतारांकित हॉटेल आणि क्लब उभारल्याची बाब समोर आली. अनाधिकृत हॉटेल आणि क्लबवर तक्रारी झाल्या. सुट्टीवर मूळ गावी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखील बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रशासकीय कारवाईला वेग आला आहे. अनाधिकृत बांधकाम प्रकरणी प्रशासनाने शुक्रवारी पाचगणीतील फर्न हॉटेल सील केलं आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पाचगणीचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि महाबळेश्वरचे मुख्याधिकारी युवराज पाटील यांनी अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे.
थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीत धनिकांनी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे केली आहेत. सध्या अनाधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला आहे. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अनाधिकृत हॉटेलच्या वादग्रस्त प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह नागरीकांनी अनेक गोष्टी समोर आणल्या. मुख्यमंत्र्यांनी अनाधिकृत असलेल्या बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे थेट आदेशच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला.
पाचगणीतील फर्न हॉटेलचं बरंच बांधकाम हे अनाधिकृत असल्याचं आढळून आलं आहे. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापनास नोटीस बजावून संपूर्ण हॉटेल सील करण्यात आलं आहे. लवकरच प्रशासनाकडून अनाधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे. दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणीतील अनाधिकृत बांधकामांची माहिती गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासन पुढे काय काय कारवाई करणार, याकडे महाबळेश्वर, पाचगणीतील व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.