सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्यातील धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता. वाई) येथे ही दुर्दैवी घटना घडली. उत्तम सहदेव ढवळे व अभिजीत उत्तम ढवळे अशी त्यांची नावे आहेत.
धोम धरणातून भोर, खंडाळा, फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे. त्यामुळे येथे गेट टाकलेले आहे. त्यामुळे पाणीसाठा झाला आहे. या कालव्याच्या पाण्यात दुपारी पोहण्यासाठी उत्तम सहदेव ढवळे (वय ४५) व अभिजीत उत्तम ढवळे (वय १३) हे दोघे पितापुत्र गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. लोकांनी आरडाओरडा केला.
त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळुन आले नाहीत. यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स टीमच्या सुनील भाटिया यांना कळविण्यात आले. त्यांनी घटनास्थळी पाण्यात शोध मोहीम राबवली असता दोघांचेही मृतदेह सायंकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. यावेळी या शोध मोहीमेतील सदस्य अशुतोष शिंदे (वाई ) यांच्या डोक्याला बोगद्यातील लोखंडी बार लागून ते जखमी झाले. त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळी दोघांच्याही मृतदेहाचे वाई येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले.
या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. उत्तम ढवळे हे शेतकरीअसून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता. तसेच ते पट्टीचे पोहणारेही होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. या शोध मोहिमेत सुनील भाटिया, अमित कोळी, सचिन डोईफोडे , सौरव साळेकर, सौरभ गोळे, महेश बिरामने अजित जाधव, आशिष बिरामने, ऋषिकेश जाधव, आशितोष शिंदे यांनी ही शोधमोहीम राबवली.