कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलमागे असलेल्या सोसायटीमध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एकाने कुटुंबावर गोळीबार केला. त्यामध्ये वडिलांसह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी सावधगिरी बाळगत शिताफिने हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह १६ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत.
प्रदीप शंकर घोलप व श्राव्या शंकर घोलप अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी हल्लेखोर सुरेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथे होली फॅमिली स्कूलमागे ओम कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीत २० फ्लॅट असून प्रदीप घोलप हे सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर सुरेश काळे हा कुटुंबासह राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रदीप घोलप हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. त्यावेळी सुरेश काळे याने दुचाकी वाटेतच लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सुरेश काळे याला दुचाकी व्यवस्थित बाजूला लावण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर प्रदीप घोलप आपल्या फ्लॅटमध्ये गेले. कुटुंबासह ते जेवण करीत असताना बेल वाजल्यामुळे प्रदीप यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी सुरेश काळे दरवाज्यात उभा होता. मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तो घरात घुसला. प्रदीप यांनी त्याला बसायला सांगितले. मात्र, अचानक त्याने स्वतःजवळील पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला. त्यामध्ये प्रदीप घोलप व त्यांची मुलगी श्राव्या घोलप हे दोघेजण जखमी झाले.
घटनेनंतर आरडाओरडा झाल्यामुळे नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्याचवेळी सुरेश काळे त्याच्या फ्लॅटमध्ये गेला. त्याने त्याच्या कुटुंबासह स्वतःला आतमध्ये कोंडून घेतले. काही वेळातच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक राजेश माळी, उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार सागर बर्गे यांच्यासह पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यांच्यासह नागरिकांनी जखमी प्रदीप घोलप व त्यांच्या मुलीला उपचारार्थ रुग्णालयात हलवले.
दरम्यान, सुरेश काळे याच्याकडे बंदूक असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरी बाळगत त्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आवाहन केले. मात्र, तो दरवाजा उघडत नव्हता. अखेर पोलिसांनी विनंती करून त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. त्याने दरवाजा उघडताच पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला ताब्यात घेतले.