सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यानुसार आता राज्य शासनाने अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती मौजना निकषात सुधारणा केली आहे. त्यामुळे नवीन सिंचन विहिरीस चार लाख आणि दुरुस्तीसाठी एक लाख रुपये मिळणार आहेत.
राज्य तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. काही योजना या १०० टक्के अनुदानावर असतात. तर काहींना २५, ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत असते. तसेच यातून अनेक शेतकरी सधन झाले आहेत तर राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते.
त्याचबरोबर अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतलेला आहे.