कराड तालुक्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | येत्या १५ दिवसात बाधीत जमिनींचा मोबदला न मिळाल्यास सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू प्रकल्प बाधीत संतप्त शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन देखील काल प्रशासनास दिले आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाधीत जमिनींचा सर्वे होऊन १३ वर्षे उलटून गेली मात्र अद्याप या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही. शासनाने खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी अंतर्गत भूसंपादन प्रक्रिया राबवण्यासाठी ऑगस्ट २०२० व सप्टेंबर २०२१ ला रीतसर अधिसूचना प्रसिद्ध करून बाधीत शेतकऱ्यांचे गट क्रमांक प्रसिद्ध केले. तसेच संबंधित शेतकऱ्यांची संमतीपत्रे, व फेरफार उतारे मागवले. सर्व शेतकऱ्यांनी शासनास आपले प्रस्ताव दिले. मात्र, चार वर्षे उलटून गेली तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अद्याप जमीन मोबदला मिळालेला नाही.

शेतकरी गेली चार वर्षे ओगलेवाडी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे बाधीत जमिनींचा मूळ सर्वेमध्ये समावेश झालेला न्हवता. शेतकऱ्यांनी पाठपुरावा करून या वंचित जमिनींचा फेरसर्वे व मोजणी करण्यास प्रशासनास भाग पाडले. मात्र सर्वे होऊन दोन वर्षे होत आली तरी या बाधीत जमिनींचा अद्याप नकाशा तयार नाही. प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांना आजअखेर जमीन मोबदला मिळू शकलेला नाही. याकरता शेतकऱ्यांनी येत्या १५ दिवसात जमीन मोबदला न मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सुपने पश्चिम सुपने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व बाधित शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.