कराडात घुमला डीजेचा दणदणाट; बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यांनी काढाली सर्जा-राजाची मिरवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमाने इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे बेंदूर. बेंदरादिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. बैलांची खांदेमळणी अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात. बैलांच्या शिंगाना रंगरंगोटी करून रंगीबेरंगी गोंडे बांधले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. आतापर्यंत बेंदूर सण अशा पारंपारिक पध्दतीने साजरा केला जात असे. मात्र, बेंदूर सणाचं स्वरूपही आता बदलत चालल्याचा प्रत्यय कराडमधील मिरवणुकीत आला. कराडमध्ये शेतकरी दरवर्षी बेंदरादिवशी बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात. परंतु, यंदाच्या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांऐवजी चक्क डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

कराड शहरात असलेल्या मंगळवार पेठेतून मुख्य टपाल कार्यालयमार्गे मुख्य बाजार पेठेतून डीजेच्या दणदणाटात निघालेली बैलांची मिरवणूक आणि शेतकऱ्यांचा उत्साह पाहायला व्यापाऱ्यांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

साताऱ्यात देखील बैलांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माने परिवाराने आपल्या घरातील सर्व बैलजोड्या सजवल्या. त्यांच्या शिंगांना मोरपिसे, बेगड, हार, झुली घातल्या, गोडधोड खाऊ घालून रात्री बैलांची भर पावसात डीजेच्या दणदणाटात भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत तरूणांचा दांडगा उत्साह होता. धुराचे फवारे आणि डीजेच्या तालावर तरूणाई थिरकत होती. डॉल्बीतली दणदणाटाची मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंचा समुदाय मिरवणुकीत सहभागी झाला होता. राजवाडामार्गे मोती चौक, देवी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक संपल्यावर बैल जोड्यांचे सुवासिनींनी औंक्षण करून बेंदराचा सण मोठ्या थाटात साजरा केला.