सातारा प्रतिनिधी | धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचे हक्काचे पाणी सत्तेच्या जोरावर खटाव माण खंडाळा फलटण तालुक्यात पाणीटंचाई दाखवून, बळकवडी कालव्याद्वारे संबंधित तालुक्यात सोडण्यात आलेले आहे. राजकीय सत्तेच्या बळावर धोम धरण क्षेत्रातील पाणी खटाव, माण, खंडाळा, फलटण भागात पळवल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचा धोम धरण संघर्ष समितीने निषेध केला आहे. त्याचबरोबर धोम धरण लाभक्षेत्रातील क्षेत्रातील शेतकऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी व गैरमार्गाने सोडलेले पाणी बंद करण्यासाठी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
शेती पाण्याचे नियोजन पूर्णपणे राजकीय दबावापोटी वापरले जात आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची झाली आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काची पाणी राजकीय दबाव टाकून माण, खटाव, खंडाळा, फलटण, या तालुक्यात पळवले जात आहे. धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी त्याग केला म्हणूनच दोन धरण उभे राहिले. आपली पिढ्यानपिढ्या असणारी जमीन, घरे- दारे ,सोडून अनेक गावे विस्थापित झाली. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विस्थापितांना आपल्या जमिनी दिल्या. दोघांनी त्याग केला.
मात्र, राजकीय दबाव वापरून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी नियमबाह्य पळवले जात आहे. याचा शेतकऱ्यांसह धोम धरण संघर्ष समिती निषेध करत आहे आणि आपल्या हक्कासाठी कोरेगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत आहे. राजकीय दबावापोटी पाणी पळवणे बंद करावे आणि धोम धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे या आशयाचे निवेदन कोरेगाव तहसीलदार आणि कोरेगाव प्रांताधिकारी यांना धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आले.