कराड प्रतिनिधी । आरफळ कालव्यातून पाणी सोडण्याबाबत व हणबरवाडी – शहापूर योजनेला पाणी सोडण्याबाबत कराड उत्तर मतदार संघाचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नुकतीच भेट घेतली. तसेच तारळीचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आरफळ कालव्यात सोडण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर मसूर पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून दि. १८ मार्च रोजी पाणी सोडणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कराड-उत्तर विधानसभा मतदार संघातील मसूर, तालुका-कराड पूर्व दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त असणाऱ्या आरफळ कालव्यातून दरवर्षी खरीप, रब्बी उन्हाळी आवर्तने दिली जातात. या आरफळ कालव्याचा कराड तालुक्यातील मसूर पूर्व भागातील सुमारे पाडळी हेळगाव पासून मेरवेवाडी राजमाची पर्यंत सुमारे २५ गावे आहेत. हणबरवाडी-शहापूर उपसा सिंचन योजना चालू केल्यानंतर व आरफळ कालव्यामध्ये पाणी सोडल्यानंतर नळपाणी पुरवठा योजनेव्दारे लोकांना पिण्यासाठी व जनावरांची कायमस्वरुपी सोय होणार आहे, यावर्षी रब्बी हंगामातील कालवा सल्लागार समितीची पाणी आवर्तनाबाबत बैठक झाली नाही.
जलसंपदा विभागाने सोयीनुरुप पाणी सोडले. परंतु प्रत्यक्ष उन्हाळी आवर्तनाचे नियोजन केलेले स्पष्ट नोंद होत नाही. सुरुवातीपासून ० ते २० कण्हेर डावा व आरफळ ० ते ४५ कि.मी. पर्यंत पाणी उपसा नियंत्रित न केल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला दिसून येत आहे परिणामी उन्हाळी आवर्तन सोडण्यास विलंब होत आहे. उन्हाळी आवर्तनाचे पाणी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व राजकीय दबावाखाली पाणी सोडले जात नाही, याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनांद्वारे केली आहे.