कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कोरेगाव येथील पुणे – मिरज – लोंढा रेल्वे दुहेरीकरणामध्ये बागायती शेतजमिनी संपादित होणार आहेत. या संपादित होणाऱ्या जमिनीवरून आता प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक झालेले आहेत. त्यांनी संबंधित जमिनीचा प्रकल्पबाधित मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना नुकतेच शेतकऱ्यांनी दिले.
यावेळी सातारा रेल्वे लढ्याचे प्रवर्तक विकास थोरात, संभाजी पाटील, लालासाहेब पाटील, दिलीप पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हंटले आहे की, खासदार श्रीनिवास पाटील यांनी जिल्ह्यातील रेल्वे भूसंपादनाचा ९५ टक्के प्रश्न मार्गी लावला असून, उर्वरित गावांचा प्रश्न सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मार्गी लावावा.
कोरेगाव कार्वे (ता. कराड) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होत असून, याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी भूसंपादन प्रस्ताव देऊ असे तोंडी सांगितले होते. जमिनींची संयुक्त मोजणी करून मोबदला दिल्याशिवाय काम सुरू करणार नाही, असे मान्य केले होते, परंतु साधारणतः ५ महिने उलटून सुद्धा रेल्वेप्रशासन अद्यापही सदर भूसंपादनाचा प्रस्ताव देत नाही.
रेल्वे अधिकारी शंभू चौधरी मध्य रेल्वे, सातारा व बलवंत कुमार मध्य रेल्वे हे टाळाटाळ करून सदर जमिनी गिळंकृत करू पाहत आहेत. पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे लाईन सदर्न मराठा रेल्वेचे (ब्रिटीशकालीन) चे सर्व महसुली पुरावे उपलब्ध आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे गट विभाजनाचे (एकत्रिकरणाचे) रेकॉर्ड सुध्दा उपलब्ध आहे. त्यानुसार रेल्वेने सीमांकनाचे चुकीचे पोल रोवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने बेकायदेशीर रित्या आमच्या क्षेत्रावर अतिक्रमण न करता रितसर प्रस्ताव द्यावा व संयुक्त मोजणी करून थेट खाजगी वाटाघाटी भूसंपादन कायद्यान्वये पाचपट मोबदला द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.