कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस पडल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून सरकार व जिल्हा प्रशासनाने तातडीने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाय योजना युद्ध पातळीवर राबवाव्यात,अशी मागणी कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी शिवाजी पाटील, विश्वास कणसे, विश्वजित थोरात, सुनील पाटील, पांडुरंग पाटील, रामचंद्र गायकवाड, संभाजी गायकवाड, संदीप साळुंखे, संजय माळी व शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी जिल्ह्यात एप्रिल मे या महिन्यात वळीव पाऊस पडतो,या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व मशागत करता येते,तसेच हा पाऊस ऊसा सारख्या पिकांनाही पोषक असतो,मात्र यावर्षी किरकोळ अपवाद वगळता वळीव पाऊस पडलेला नाही,त्यातच मान्सूनच्या पावसाने दगा दिल्याने यावर्षी बहुतांश तालुक्यात खरीप पेरण्या उशिराच झाल्या,जुलै महिन्यात काही दिवस थोडा पाऊस पडल्याने खरीप हंगाम पीके कशीबशी तग धरून होती,मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा जाऊन सप्टेंबर संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही.
खरीप हंगामातील भुईमूग,सोयाबीन,भात,हायब्रीड,सर्व प्रकारची कडधान्ये ही पिके आता माना टाकू लागली असून,खरीप हंगामातील आशा शेतकऱ्यांच्या दृष्टीने जवळ जवळ संपल्यात जमा आहेत,परतीचा मान्सून ही अद्याप पडलेला नाही. शेतकऱ्यांनी जेथे पाण्याची सोय आहे तेथे पाणी देऊन कशी तरी पिके जगवण्याची धडपड सुरू ठेवली आहे. मात्र, अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी ओढे,नाले,ओहोळ,विहरी,नद्या, बोअर यांना पाणी तोकडे आहे,त्यामुळे पिके जगणे मुश्कील आहे.
उसासारख्या बागायत पिकाला ही यावर्षी कमी पावसाचा फटका बसणार असून ऊसाची वाढ खुंटली आहे,तसेच उसावर हुमणी, लोकरी मावा अशा कीड रोगांचे संकट निर्माण झाले आहे. परिणामी ऊसाचे उत्पादन यावर्षी निम्म्याने घटणार आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई, चारा टंचाई मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागली आहे,त्यामुळे पशुधन धोक्यात आहे तर पाणीटंचाईमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. या तालुक्यात टँकर ने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वरील सर्व भीषण परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाय योजना सरकार व जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर राबवाव्यात.