सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून 7 हजार 561 हेक्टरवर कांदा लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढले असल्याने गृहिणीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. दरम्यान, जिल्ह्यात कांदा लागवडीचे प्रमाण देखील वाढले आहे. सहा महिन्यांत कांद्याचे दर समाधानकारक राहिल्याने जिल्ह्यात कांदा पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. यामुळे बियाणे, रोपाची दरात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सात हजार ५६१ हेक्टरवर कांदा लागवड झाली असून सरासरीपेक्षा यावर्षी २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील पूर्व भागात सर्वाधिक कांदा पीक घेतले जाते. यामध्ये कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा व फलटण तालुक्याचा समावेश आहे. मागील दोन वर्षांत समाधानकारक दर मिळाला असल्याने पूर्व भागासह पश्चिम भागात कांदा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पूर्व भागात ७० टक्के लागवडीचे काम उरकले असून पश्चिम भागात सध्या कांदा लागवडीचे काम गतीने सुरू आहे. जिल्ह्यात होणाऱ्या एकूण लागवडीपेक्षा किमान २० टक्के क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. कांद्याची मागणी चांगली असल्याने या हंगामात कांदा बियाणे व रोपांना मागणी चांगली झाली आहे. या हंगामात कांदा बियाण्यांस किलोला १८०० ते २००० रुपये दर मिळाला आहे. बागायत पट्ट्यात रोपे खरेदी कल असल्याने रोपांच्या नर्सरी शेतकरी करत आहेत.

नर्सरीतून खरेदी केलेल्या एकरी रोपासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दर चांगले राहतील या आशेवर जास्तीच्या दराने रोपे खेरदी केली जात आहेत. यामुळे भांडवली खर्चात वाढ होत आहे. पश्चिम भागात उसासह इतर पिकांत आंतरपीक म्हणून कांदा केला जात आहे. रोपे लागवड, कांदा पेरणी व बियाणे विस्कटून कांदा केला जात आहे. वातावरील बदलामुळे रोपे खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कोरेगाव २४१, खटाव २५४१, माण २१७१, फलटण १९६८, खंडाळा ६१०, वाई ३०.८५ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. पुढील दोन सप्ताहांत १५ हजार हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे.