सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नुकतीच अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी खंडाळा तालुक्यात पाणी प्रश्न अजूनही गंभीर आहे. येथील धोम-बलकवडीच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकार्यांनी तोंडी आदेश देखील दिले. मात्र, अद्याप पाणी न सोडले नाही. त्यामुळे आज शनिवारी पाणी सोडले नाही तर उद्या रविवार, दि. २१ रोजीपासून खंडाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांसोबतच शेती व जनावरांवर मोठे संकट उभे राहिले आहे. याबाबतचे निवेदन दिल्याने दि.15 रोजी जिल्हाधिकार्यांद्वारे संबंधित पाणी विभागाचे सर्व अधिकारी व शेतकरी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. यावेळी संबंधित अधिकार्यांना दोन दिवसांमध्ये खंडाळा तालुक्यात पाणी सोडण्याबाबतचे तोंडी आदेश दिले होते. मात्र, यावर पाणी न सोडल्याने शेतकरी संतप्त झाले असून शेतकर्यांनी धोम-बलकवडी धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केली असता पाणी आवर्तन करण्यासाठी दोन्ही धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसून आले. यावर संबंधित विभागांच्या अधिकार्यांकडे चौकशी केली असता याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याने पाण्याचे आवर्तन सोडू शकत नाही असे सांगण्यात आले.
यानंतर गुरुवार दि. 18 रोजी शेतकर्यांनी तहसीलदार खंडाळा यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत विचारणा केली. यावेळी तहसीलदार खंडाळा यांच्याद्वारे तात्काळ जलसंपदा विभाग सातारा कार्यालयातील संबंधित अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क केला. त्यावेळी त्यांनाही दोन-तीन दिवसात पाणी सोडण्यात येईल असेच सांगण्यात आले. तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन खंडाळा तहसीलदारांना परत एकदा देण्यात आले असून यामध्ये शनिवार, दि.21 रोजी धोम-बलकवडी कालव्याचे पाणी न सोडल्यास रविवार, दि. 2१ पासून खंडाळा तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपोषण करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.